भाजप सेना युती मोठ्या बहुमताने सत्तेवर येई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली असून या विकासकामांच्या जोरावरच भाजप शिवसेना महायुती मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी व्यक्त केला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस व भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभागाचे प्रमुख केशव उपाध्ये, प्रदेश सचिव संजय उपाध्याय उपस्थित होते.

मा. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला कार्यक्षम आणि विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकारने प्रत्येक समाज घटकासाठी योजना आखल्या. जलयुक्त शिवार सारख्या योजनेमुळे शेतीला शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग  उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी फडणवीस सरकारने निर्धाराने पावले टाकली आहेत. फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुंबईत आणि महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या पाच वर्षांत हिंसाचाराची एकही घटना घडलेली नाही. लातूर सारख्या शहराला रेल्वेतून पिण्याचे पाणी पुरविण्याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनीच प्रत्यक्षात आणली. यामुळेच मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवून भाजप शिवसेना महायुती पुन्हा सत्तेवर येईल .

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रयत्न करीत आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. या संदर्भात आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांच्याशी आज पुन्हा चर्चा करणार आहोत. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काय करता येईल यासाठी केंद्रीय अर्थ आणि बँकिंग खात्याचे सचिव  आणि  रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांची समिती नियुक्त करण्यात येईल. सहकारी बँकांत असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल. या साठी संसदेच्या आगामी अधिवेशनात संबंधित कायद्यात बदलही करू, असेही मा. निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Print Friendly, PDF & Email

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.