*पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवतील*

*भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांचे प्रतिपादन*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित बनवला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकसित बनविण्याचे काम केले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा बनवा, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचे डबल डेकर सरकार महाराष्ट्राला संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सांगली जिल्ह्यात जत येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मा. अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विधानसभा प्रचाराला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख, खासदार संजयकाका पाटील, जतचे भाजपा उमेदवार आ. विलासराव जगताप, मिरज मतदारसंघातील उमेदवार व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, सांगलीचे उमेदवार आ. सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, प्रदेश सचिव मकरंद देशपांडे व सांगली ग्रामीण अध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.

मा. अमित शाह म्हणाले की, रात्रंदिवस महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहे असा मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आपण कधी पाहिला नाही. त्यांच्या मनात सदैव शेतकरी, युवक, उद्योग, सहकारिता यांच्या विकासाचा विचार असतो. त्यांच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्र 32 लाख हेक्टरवरून वाढून 40 लाख हेक्टर झाले. रस्ते, जलयुक्त शिवार, सिंचन अशा अनेक क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने खूप चांगले काम केले आहे.

ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वसंतराव नाईक वगळता एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे पदावर राहिला नाही कारण दिल्लीचे सत्ताधारी सातत्याने मुख्यमंत्री बदलत होते. पण गेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी स्थिरतेसह महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे नेले आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कामांचा मोठी यादी आपण वाचू शकतो. शरद पवार यांनी मात्र सांगलीला हिशेब दिला पाहिजे की, त्यांच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिले.

 

सांगली जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती देऊन त्यांनी सांगितले की, कर्नाटकच्या सीमेवरील गावांना पाणी देण्याचे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पहिल्या संसद अधिवेशनातच काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम 370 व 35 ए रद्द केले आणि देशाला अखंडित करण्याचे महान काम केले. संपूर्ण जगाने याचे समर्थन केले असून त्याबद्दल अपप्रचार करणारा पाकिस्तान एकाकी पडला आहे.

त्यांनी सांगितले की, देशभरातील सर्व जनता मानते की काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र कलम 370 हटविण्यास विरोध केला कारण त्यांना वोटबँकेचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण करायचे आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांगावे की, आपला कलम 370 हटविण्यास पाठिंबा आहे की नाही.

ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या विरोधातले युद्ध जिंकल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी होते. राष्ट्राचे हित हे पक्षाच्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे आम्ही मानतो. पण भारताने सर्जिकल स्ट्राईक केला आणि एअर स्ट्राईक केला त्यावेळी काँग्रेसने विरोध केला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा दिल्या त्यावेळी राहुल गांधी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडून बाजू घेतली.

Print Friendly, PDF & Email

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.